(१)
जेजुरगड पर्वत शिव लिंगाकार
मृत्यू लोकी दुसरे कैलास शिखर
नाना परीची रचना रचिली अपार
जळी स्थळी नांदे स्वामी शंकर ॥ १ ॥
जयदेव जयदेव जय शिव मार्तंडा
अरी मर्दन मल्लारी तुझी प्रचंडा ॥ धृ ॥
मणी मल्ल दैत्य प्रबळ जाहला
येवूनी त्याने प्रलय मांडीला
न आटोपे कोणा स्मरणे मातला
देव गण गंधर्व कापती त्याला ॥ २ ॥
जयदेव जयदेव जय शिव मार्तंडा
अरी मर्दन मल्लारी तुझी प्रचंडा ॥ धृ ॥
चंपाषष्ठी दिवसी अवतार धरिसी
मणी मल्ल दैत्यांचा संहार करिसी
चरणी पृष्ठी खडगे वर्मी स्थापिसी
अंती वर देवूनिया मुक्तीसी नेसी ॥ ३ ॥
जयदेव जयदेव जय शिव मार्तंडा
अरी मर्दन मल्लारी तुझी प्रचंडा ॥ धृ ॥
मणी मल्ल दैत्य नामे मल्हारी
देवा संकट पडले आहे जेजुरी
अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी
देवा ठाव माझे दास नरहरी ॥ ४ ॥
जयदेव जयदेव जय शिव मार्तंडा
अरी मर्दन मल्लारी तुझी प्रचंडा ॥ धृ ॥
(२)
पंचानन हय वाहन सूर भूषित निळा
खंडा मंडित दंडित दानव अवळीला
मणी मल्ल मर्दूनी तो धूसर पिवळा
करी कंकण बाशिंगे सुमनांच्या माळा
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी
वारी दुर्जन असुरा भवदुस्तर तारी ॥ १ ॥
सुरवर सत्वर वर दे मजलागी देवा
नाना नामे गाईल हि तुमची सेवा
अघटीत गुण गावया वाटतसे हेवा
फणीवर शिणला तेथे नर पामर केवा
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी
वारी दुर्जन असुरा भवदुस्तर तारी ॥ २ ॥
रघुवरस्मरणी शंकर हृदयी निवाला
तो हा मल्लांतक अवतार झाला
यालागी आवडे भावे वर्णिला
रामी रामदास जिवलग भेटला
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी
वारी दुर्जन असुरा भवदुस्तर तारी ॥ ३ ॥