श्रीज्ञानदेवाची आरती
आरती ज्ञानराजा ॥ महाकैवल्यतेजा ॥
सेविती साधुसंत ॥ मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥
लोपलें ज्ञान जगीं ॥ त नेणती कोणी ॥
अवतार पांडुरंग ॥ नाम ठेविलें ज्ञानी ॥ आरती ॥ १ ॥
कनकांचे ताट करीं ॥ उभ्या गोपिका नारी ॥
नारद तुंबरु हो ॥ साम गायन करी ॥ आरती० ॥ २ ॥
प्रगट गुह्य बोले ॥विश्व ब्रह्मची केलें ॥
रामा जनार्दनीं ॥ पायीं ठकचि ठेलें ॥ आरती० ॥ ३ ॥
श्रीनामदेवाची आरती
जन्मतां पांडुरंगें ॥ जिव्हेवरी लिहिलें ॥
अभंग शतकोटी ॥ प्रमाण कवित्व रचिले ॥ १ ॥
जय जयाजी भक्तराया जिवलग नामया ॥ आरती ओंवाळितां ॥
चित्त पालटे काया ॥ ध्रु० ॥
घ्यावया भक्तिसुख ॥ पांडुरंगें अवतार ॥
धरूनियां तीर्थमिषें ॥ केला जगाचा उद्धार ॥ जय० ॥ २ ॥
प्रत्यक्ष प्रचीती हे ॥ वाळवंट परिस केली ॥
हारपली विषमता ॥ द्वैतबुद्धी निरसली ॥ जय० ॥ ३ ॥
समाधि महाद्वारी ॥ श्रीविठ्ठलचरणी ॥
आरती ओंवाळितों ॥परिसा कर जोडूनी ॥ जय जयाजी० ॥ ४ ॥
श्रीतुकारामांची आरती
आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा ॥
सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवीं आम्हां ॥ ध्रु० ॥
राघवें सागरांत । पाषाण तारीले ॥
तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकीं रक्षिले ॥ आरती० ॥ १ ॥
तुकितां तुलनेसी । ब्रह्म तुकासी आलें ॥
म्हणोनि रामेश्वरें । चरणीं मस्तक ठेविलें ॥ आरती० ॥ २ ॥
श्रीएकनाथांची आरती
नामरूपीं चालक व्यापक तूं एक ॥
म्हणुनी एका नामें पाचारिति लोक ॥
ज्याचे नामें न चले विषयांचा पंक ॥
जनार्दनाजवळी कीर्तीचा जनक ॥ १ ॥
जय देव जय देव जय एकनाथा ॥
निर्विकार ब्रह्म तूंची तत्त्वतां ॥
नामें भवकुंजर ताडूनी लाथा ॥
भक्तप्रतिपालक कळिकाळमाथा ॥ ध्रु० ॥
निर्मळ गोदातटीं मुनिराज हंस ॥
निर्गुण प्रतिष्ठानीं केला रहिवास ॥
लोकत्रयीं मिरवी कीर्तीचा घोष ॥
आचार विचार निर्मळ निर्दोष ॥ जय देव० ॥ २ ॥
अपर भानुकूल उगवला भानू ॥
सूर्याचा सूर्य दैदीप्यमानू ॥
काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर मानू ॥
कृपादृष्टी करुनी वारिसि रजरेणू ॥ जय० ॥ ३ ॥
भगवद्भावें करुनी सकळांशी मैत्री ॥
जन्म म्हणुनी विश्वामित्राचे गोत्रीं ॥
विश्व तरलें हरिनामाचे मंत्रीं ॥
पाहूं न शके जवळ कळिकाळ नेत्रीं ॥ जय० ॥ ४ ॥
ब्राह्मणतीर्थी पूजे, नामाचा महिमा ॥
सत्कर्मे लोटलीं मोक्षाची सीमा ॥
नाना मतांचिया वंदूनी गरिमा ॥
मुक्तेश्वर तेथें धरियेला प्रेमा ॥ जय० ॥ ५ ॥